नवी दिल्ली – बुलेट ट्रेनची कामे सध्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू आहेत. बुलेट ट्रेनसाठी तयार करण्यात आलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गादरम्यान बांधले जाणारे सुरत हे पहिले स्थानक असेल. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चार स्थानकांवर (वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच) कामाला वेग आला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चार स्थानकांव्यतिरिक्त, 237 किमी लांबीचा एक पूल देखील बांधला जाईल. हा एक विशिष्ट प्रकारचा पूल आहे, ज्यामध्ये उंच आणि लांब रेल्वे लाईन किंवा रस्त्याला आधार देणाऱ्या कमानी आणि खांब असतात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, भारतातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये सुरत ते बिलीमोरा दरम्यान धावेल. सुरत- बिलीमोरातील अंतर 50 किलोमीटर आहे.
रेल्वे मंत्री वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, गुजरातमधील 98.62% जमीन (954.28 हेक्टरपैकी 941.13 हेक्टर) प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात, संपूर्ण संपादन (7.90 हेक्टर) आणि महाराष्ट्रात 56.39% जमीन (433.82 हेक्टरपैकी 244.63 हेक्टर) संपादित करण्यात आली आहे. यामध्ये 925 हेक्टर खासगी जमिनीचा समावेश आहे.
मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन 2017 मध्ये झाले. सुरुवातीला या प्रकल्पाचे काम 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु करोनामुळे भूसंपादनातील समस्या आणि बांधकाम विलंबामुळे प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला. 508 किमी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे बुलेट ट्रेनचे स्टेशन असतील.