बॉलीवूडप्रमाणेच क्रिकेट जगतातही अभिनेत्री प्रीती झिंटाची लोकप्रियता आहे. आयपीएलमधील किंग्ज इलेवन पंजाब संघ प्रीतीचा आहे. आयपीएलच्या आपल्या संघाच्या प्रत्येक सामन्यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देताना ती नेहमी दिसते. दरम्यान, 31 जानेवारीला प्रीतीच्या वाढदिवसानिमित्त या संघाचा माजी कर्णधार युवराज सिंहने तिला आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराजने प्रीतीसोबतचा एक फोटो शेअर करत “हैप्पी बर्थडे झूशव! आपल्या गालावरच्या खळ्या नेहमी अशाच ठेव. त्यांची काळजी घे, त्यांना जप. हे वर्ष तुझ्यासाठी आनंददायी असो. वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा’ अशा शब्दांत युवराजने प्रीतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, 2008 मध्ये प्रीती झिंटा, नेस वाडिया, मोहित बर्मन यांनी आयपीएलमध्ये किंग्ज इलेवन संघाची मालकी घेतली होती.
2009 पर्यंत प्रीती आयपीएलच्या एका संघाची मालकीण असलेली एकमेव महिला आणि सर्वात तरुण मालकीण होती. आताही संघाच्या अनेक सामन्यांवेळी ती उपस्थित असते. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या सामन्यावेळही ती हजर होती. दरम्यान, प्रीती झिंटाला बॉलीवूडमधील कलाकारांसह चाहत्यांनी सोशल मीडियावर असंख्य कमेंटस् करत शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनी प्रीतीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.