नवी दिल्ली : केंद्र सरकार 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार आहे. हे अधिवेशन नेमकं का आणि कशासाठी बोलावण्यात आले आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यावरून अनेक चर्चां ना उधाण आले आहे, त्यातच आता हे अधिवेशन नव्या संसद इमारतीत पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार काही महत्वाची माहिती आता समोर आली आहे. नवीन संसदभवनातील कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन ड्रेस कोड तयार केला आहे.
विशेष अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोड लागू केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या संसद भवनात प्रवेशावेळी नवा ड्रेसकोड असणार आहे. या कपड्यांमुळे भारतीयत्वाची प्रेरणा मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अमृत कालमध्ये नवीन बदल होण्याची पूर्ण शक्यता आहे. नव्या वेषभूषेमध्ये दोन्ही सभागृहात मार्शलच्या डोक्यावर मणिपुरी टोपी दिसणार आहे तर टेबल ऑफिस, नोटिस कार्यालय आणि संसदिय रिपोर्टिंग विभागातील अधिकाऱ्यांना कुर्ता असणार आहे. महिला अधिकाऱ्यांना नव्या डिझाइनची साडी दिली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
नव्या संसद भवनात इतरही बदल होणार आहेत. मार्शल अध्यक्षांच्या खुर्चीजवळ उभा राहतात. दररोजच्या कामात पीठासीन अधिकाऱ्यांना ते मदत करत असतात. नव्या ड्रेस कोडनुसार मार्शल आता सफारी सुटमध्ये नाही तर क्रीम रंगाचा कुर्ता आणि पायजमा घालतील. तर डोक्यावर पगडीऐवजी मणिपुरी टोपी असणार आहे. याशिवाय पाच विभागामधील अधिकारी सफारी सूट ऐवजी स्पोर्ट बटन डाऊन शर्ट घालतील. तसंच क्रीम रंगाचे जॅकेट आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून हे विशेष अधिवेशन कोणत्या कारणांसाठी बोलावण्यात आले आहे याविषयी तर्क लढवले जात आहेत. यात इंडिया आणि भारत या नावावरून सुरु असलेल्या वादावर चर्चा होणार आल्याचे म्हटले जात आहे, तर दुसरीकडे एक देश एक निवडणूकची घोषणा या अधिवेशनात करण्यात येणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. असे असले तरी सरकारने मात्र त्यांचे पत्ते अजून तरी खुले केले नाहीत,