विशेष : धास्ती एल-निनोची

प्रा. रंगनाथ कोकणे (पर्यावरण अभ्यासक)

यावर्षीचा उन्हाळा अधिक कडक असून, अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पाहावयास मिळत आहे. तीन एप्रिलपासून उष्णता आणखी वाढेल असा हवामानशास्त्र खात्याचा अंदाज होताच. हा सर्व अल-निनोच्या प्रभावाचा परिणाम आहे, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. अर्थातच, या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनही क्षीण होण्याची भीती शास्त्रज्ञांना वाटते आहे. लवकरच एल-निनोची ताजी परिस्थिती आपल्याला समजेलच; मात्र असेच वातावरण राहिल्यास कमी पावसाची धास्ती असून, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे प्रतिकूल परिणाम जाणवू शकतात.

हवामानावर एल-निनोचा असलेला प्रभाव संपूर्ण एप्रिल महिन्यात कायम राहणार आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरील भागात या कारणामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. पावसावर पडणारा एल-निनोचा प्रभाव जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असून, आठवडाभरात त्याविषयीचा अंदाज देता येणे शक्‍य होईल. एल-निनोचा प्रभाव जाणून घेणे आता अत्यावश्‍यक झाले आहे. प्रशांत महासागराच्या क्षेत्रात तापमान जर वाढले, तर अल-निनो प्रभाव दिसायला सुरुवात होते. अशा स्थितीत प्रशांत महासागराच्या क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि अरबी समुद्रावर तयार होणारे पावसाचे ढग प्रशांत महासागराच्या दिशेने ओढले जातात. त्यामुळेच भारतात पावसाचे प्रमाण कमी होते. “स्कायमेट’ या हवामानशास्त्राशी संबंधित खासगी संस्थेच्या म्हणण्यानुसार, मे आणि जून महिन्यांत दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील तापमान 45 अंशांच्याही पुढे जाण्याची भीती आहे. अर्थात मान्सूनपूर्व पावसाच्या कालावधीत अधूनमधून पावसाच्या सरीही कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून काही अंशी दिलासा मिळू शकतो.

काही ठिकाणी जोरदार वारे आणि हलका पाऊस झाला होता. इकडे मुंबईमध्ये पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वाहणारे वारे सक्रिय असल्यामुळे मुंबईकरांना दोन दिवस प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, मुंबईकरांना घामाचा त्रास नेहमीप्रमाणे होत नव्हता; परंतु उकाडा प्रचंड जाणवत होता. नेहमी पश्‍चिमेकडून म्हणजे समुद्राकडून पूर्वेकडे वारे वाहत असल्यामुळे मुंबईचे तापमान काही अंशी कमी होते आणि खाऱ्या हवेमुळे घाम येतो. यंदा काही दिवसांसाठी याच्या उलट वातावरण होते. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि आसपासच्या भागात कमाल तापमान 34.3 अंश एवढे होते. सरासरी तापमानापेक्षा ते एक अंशाने अधिक होते. किमान तापमान 21 अंश होते आणि ते सरासरी किमान तापमानापेक्षा तीन अंशांनी अधिक होते. पालम विभागात सर्वाधिक 36 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, तीन तारखेपर्यंत तापमान थोडे कमी होईल; मात्र नंतर देशाच्या विविध भागांमध्ये तापमान वाढण्याचेच संकेत मिळत आहेत.

एल-निनोचा प्रभाव आणि त्यामुळे होणारे हवामानशास्त्रीय बदल याचा थेट संबंध शेतीशी आहे आणि शेती उत्पादनाचा थेट संबंध आपल्या अर्थव्यवस्थेशी आहे. त्यामुळे प्रभावाकडे शास्त्रज्ञांचे सातत्याने लक्ष असते. अल-निनोमुळे होणाऱ्या बदलांचा पहिला तडाखा देशाच्या ग्रामीण भागाला आणि शेतीला बसतो. अल-निनोचा प्रभाव कमकुवत झाला तर चांगला पाऊस पडतो आणि खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांसह सर्वांचेच उत्पन्न वाढते. ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा लाभ होतो. मुख्य म्हणजे महागाई कमी होते.

ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारलेली असते. त्यामुळे हवामानातील बदलांचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. याउलट पावसावर अल-निनोच्या प्रभावाचा प्रतिकूल परिणाम झाला, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येते. अनेक ठिकाणी पिके हातची जातात. पावसाच्या लहरीपणाचा तोटा दुहेरी स्वरूपाचा असतो.

पाहिजे तेव्हा पाऊस पडतच नाही आणि नको असतो, तेव्हा अतिवृष्टी होते. या दोन्ही स्थितीत पिकांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते. अल-निनोचा प्रभाव पावसाचे प्रमाण कमी करण्यास जसा कारणीभूत ठरतो, तसाच तो अवकाळी पावसासाठीही कारणीभूत ठरतो. त्यामुळेच अल-निनोसंदर्भातील हालचालींवर हवामान शास्त्रज्ञांचे कायम लक्ष असते. यावर्षी अल-निनोचा प्रभाव अधिक असून, त्यामुळेच सध्याची उष्णतेची लाट जाणवत आहे, याचाच अर्थ प्रशांत महासागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन अरबी समुद्रावरील पावसाचे ढग त्या दिशेने खेचले जाण्याची शक्‍यता आहे. म्हणजेच भारतातील मोसमी पावसावर प्रतिकूल परिणाम होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. यासंदर्भातील ताजी परिस्थिती आठवडाभरात आपल्यासमोर येईलच; परंतु सध्या जे संकेत मिळत आहेत, ते भारतीयांना विशेषतः शेतकऱ्यांना घाबरवून सोडणारे आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.