नाते – आपल्या जोडीदारालाच विश्‍वासात घ्या

स्वाती वाळिंबे 

मुलाचा जन्म हा खरं तर किती आनंदाचा क्षण, पण त्याच्या आगमनानंतर नवऱ्याला योग्य वेळ देऊ शकत नाहीये ही खंत अनघाला सतावत होती. त्यात नोकरी आणि घर अशी दुहेरी कसरत करावी लागत असल्याने परिस्थिती आणखीनच बिकट होत होती. त्याची चिडचिड तिच्या लक्षात येत होती. पूर्वीसारखं त्याच्या मनाप्रमाणे आपण त्याला सुख देऊ शकत नाही ही बोचही मनात होती. पण त्यासाठी मातृत्व पणाला लावणंही शक्‍य नव्हतं. त्याने समजावून घ्यायला हवं ही तिची अपेक्षा पण हे त्याच्याशी बोलण्याची मनाची तयारी होत नव्हती.

साधनाचा प्रश्‍न जरा वेगळा होता. ती आता पन्नाशीच्या घरात होती आणि शारिरीक गरजा पूर्ण करताना आपण पूर्वीसारखा आनंद घेऊ शकत नाही हे तिला जाणवायला लागलं होतं, पण नवऱ्याला हे सांगताना तिला खूपच ऑकवर्ड वाटायचं कारण त्याला काय वाटेल ही भीती मनात होती. इतक्‍या वर्षाचा संसार या कारणाने मोडणार तर नाही? आपण आपली असमर्थता दाखवली तर ते सुख तो बाहेर तर शोधणार नाही या आणि अशा अनेक विचारांनी तिला घेरलं होतं. डॉक्‍टरांकडून तिला मोनापॉजमुळे ही इच्छा कमी झाल्याचं कळलं होतं पण नवऱ्याला हे कसं समजावून सांगायचं हा प्रश्‍न होता. त्यापेक्षा मुलीच्या 12 वी च्या अभ्यासाचं कारण देऊन तिच्या खोलीतच झोपायला तिने सुरूवात केली पण त्याने प्रश्‍न सुटला नाही तर आणखीनच बिघडला.

शामलीची कथा तर आणखीनच वेगळी. तिला वाढत्या वजनाने बेजार केलं होतं. त्यामुळे तिचा आत्मविश्‍वास कमी होऊ लागला होता. आता नवरा आपल्याशी पूर्वीसारखं प्रेमाने वागत नाही आणि त्याने बाहेर हे सुख नक्कीच शोधलं असणार या विचारांनी ती मनातल्या मनात कुढत होती. छोट्या छोट्या कारणांवरून रूसून फुगून बसणं हे आता नेहमीचं झालं होतं. आपण लहान मुलासारखं वागतोय हे तिला कळत होतं पण मनातलं मोकळेपणाने बोलायची तिला लाज वाटत होती.

सागरची मानसिक परिस्थिती तर फारच वेगळी झाली होती. पहिल्यापासूनच अध्यात्मात रमणाऱ्या सागरला संसार असार आहे हे आता कळून चुकलं होतं आणि त्यापासून विरक्ती घ्यायची हे त्याने ठरवलं होतं. खरं तर त्याला संन्यास घेऊन कुठेतरी निघूनच जायचं होतं पण लग्न झाल्याने बायकोची जबाबदारी टाळायची नव्हती. पण आपलं मन संसारात रमत नाही हे तिला सांगायची त्याची हिंमत होत नव्हती. म्हणूून नोकरीत लांबच्या बदल्या तो घेऊ लागला आणि जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्यामुळे ना त्याच्या मनाला समाधान मिळत होतं ना बायकोला आपलं काय चुकतंय ते कळत होतं.

अशी समस्या अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी येते. त्यात गैर काही नाही. उलट आयुष्याच्या काही टप्प्यांवर असं वाटणं ही नैसर्गिक बाब आहे. विज्ञानानेही ते आता सिध्द केलंय पण या विषयाबाबत बोलणं आपल्याकडे निषीध्द मानलं गेल्याने अशा गोष्टी मनातच ठेवल्या जातात. मनातच त्यावर विचार केला जातो आणि मनानेच त्यावर मार्ग शोधले जातात पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. खरं तर हे मानसिक खेळ नाहीत तर हे शारिरीक आणि मानसिक इच्छांचे मिश्रण आहे. टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोनची त्यात मुख्य भूमिका असते. यामुळे शरीराची शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा नियंत्रित होत असते. या हार्मोनवर प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन अशा केमिकलचा आणि तणाव, दबाव, व्यस्तता अशा कारणांचा प्रभाव पडत असतो. महिलांच्या बाबतीत अनेक कारणांनी ही इच्छा कमी होऊ शकते. त्यात प्रामुख्याने गर्भावस्था, मोनोपॉज किंवा पिरीअडच्या वेळी अधिक त्रास होणं ही काही प्रमुख कारणं आहेत. मुड स्वींग आणि आत्मविश्‍वासाच्या कमतरतेमुळेही ही इच्छा कमी होते.

पुरुषांमध्येही लिबिडो कमी होण्याची अनेक कारणं असू शकतात. मुख्यत: टेस्टोस्टेरॉनच्या स्तरात कमी आल्याने त्यांची ही इच्छा कमी होते. यामुळे प्रतिस्पर्ध्याची भावना, आक्रमकता वाढीस लागणे असे काही बदलही दिसून येऊ लागतात. 30 वर्षानंतर या स्तरात दरवर्षी दोन ते तीन टक्‍क्‍यांनी घट होते. त्यामुळे त्यांच्यातही शारिरीक संबंध ठेवण्याबद्दल नकारात्मता येऊ शकते. याशिवाय स्त्री आणि पुरूष या दोघांमध्ये शारिरीक ताण, मानसिक दबाव आणि बॉडी फॅट वाढणे या कारणानेही लिबिडोमध्ये घट होऊ शकते. त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर तर होतोच पण पती- पत्नीच्या नात्यावरही होत असतो.

यावर उपाय काय तर जोडीदाराला विश्‍वासात घेऊन आपली परिस्थिती सांगितली पाहिजे. त्याने ती समजून घ्यावी ही अपेक्षा असेल तर आधी त्याला त्याची कल्पना दिली पाहिजे. चर्चा करणं अवघड वाटत असेल तर या क्षेत्रातील तज्ञांची मदत घ्या. आजकाल लैंगिक समस्या सोडवणारे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यात कसंल्टेशन, कौन्सिलिंग अशा पर्यायांचाही समावेश होऊ शकतो. या विषयावरची तुम्हाला माहित असलेली माहिती एकमेकांशी शेअर करा. त्यावर चर्चा करा. आजवर तुम्ही जोडीदाराला पूर्ण सुखी करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमच्या अवघड काळात जोडीदारही तुमची बाजू नक्कीच समजावून घेईल. गरज आहे ती मन मोकळं करण्याची! ही एक अवघड फेज आहे हे खरंय, पण त्यासमोर हार मानून एकमेकांबद्दल गैरसमज करून घेण्यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी त्याच्याशी सामना कसा करता येईल याचे उपाय शोधायला हवेत. त्यासाठी आधी आपल्याला काय होतंय याची वैद्यकीय कारणं जाणून घ्या आणि त्यावर उपाय शोधताना आपल्या जोडीदाराला विश्‍वासात घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.