माद्रिद – स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत रेयाल माद्रिदने एइबार संघाचा 3-1 असा सहज पराभव करत
स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. मात्र, या विजयानंतर या सामन्यात कृष्णवर्णीय खेळाडू मार्सेलो विएरा याने गोल केल्यानंतर आनंद साजरा करताना एकप्रकारे जे इशारे केले त्यातून त्याचे कृष्णवर्णीयांच्या आंदोलनाला समर्थन दिल्याचेही समोर आले.
अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर आता जगभरात आंदोलने सुरू झालेली असताना या स्पर्धेवरही त्याचे सावट होते. घरच्या मैदानावर खेळताना रेयाल माद्रिदने एइबारचा पराभव केला. त्यात टोनी क्रूज आणि सर्जियो रमोस यांनी गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
सामन्यातील तिसरा गोल मार्सेलो याने केला व संघाच्या आनंदचा जल्लोष सुरू असताना त्याने गुडघ्यावर बसून कृष्णवर्णीयांच्या आंदोलनाला समर्थनही दिले. आता क्लबकडून अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, मार्सेलोवर कारवाई होणार का नाही याचे उत्तर येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या सामन्यातील विजयासह रेयाल माद्रिदने स्पर्धेत 59 गुणांची नोंद केली व बार्सिलोनासमोर आव्हान निर्माण केले. बार्सिलोनाचे 61 गुण असून स्पर्धेच्या विजयाची दोन्ही संघांना समान संधी आहे.