मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार पृथ्वी अंबर लवकरच मराठी सिनेमामध्ये एंट्री करणार आहे. ‘सरी’ या चित्रपटात पृथ्वी अंबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी या चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या गाण्यामध्ये पृथ्वीची झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर पृथ्वीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि पृथ्वी अंबर यांच्या प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे.
‘सरी’ या चित्रपटातील ‘मला का भासे’ हे प्रेमगीत सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात रितिका श्रोत्री आणि अजिंक्य राऊत यांच्यात हळुवार खुलणारं प्रेम दिसत आहे. या सिनेमात रितीका दियाच्या आणि अजिंक्य रोहित नावाची भूमिका साकारणार आहे. या दोघांच्या प्रेमाचा प्रवास या गाण्यात पाहायला मिळत आहे.
यापूर्वी ‘नटरंग, नटसम्राट आणि सैराट सारख्या सिनेमांचा मी चाहता आहे. सर्वोत्कृष्ट अभिनय, कलाकार आणि संगीतासाठी हे सिनेमे मी सतत पाहतो. मी कधी कल्पनाही केली नव्हती की, मी मराठी चित्रपटात काम करेन,’ असे पृथ्वी अंबर म्हणाला होता. तसेच त्याने या मराठी सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता.
आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले असून, सरी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच ते मराठीत पदार्पण करत आहेत. दरम्यान, ‘सरी’ प्रेमकथा असलेल्या नवाकोरा चित्रपट तरुणाईच्या मनाला भिडणारा आहेत. येत्या 5 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.