नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर आता सारीचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात बारा रुग्ण सापडले आहेत. यासर्वांवर उपचार सुरू असून जिल्हा रुग्णालयात सारीच्या रुग्णांसाठी 20 बेडचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.
“करोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या सारीच्या रुग्णांचे सुद्धा घशाचे स्त्राव नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. सारी व करोना या दोन्हींची लक्षणे काहीशी सारखीच आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांना सारीच्या रुग्णांचीही माहिती नियमितपणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत बारा सारीच्या रुग्णांची माहिती प्राप्त झाली आहे. या रुग्णांसाठीही जिल्हा रुग्णालयातून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरू असून ते त्याला चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती देण्यात आली.
खासगी रुग्णालयात आलेल्या बाह्यरुग्ण व आंतररुग्णामध्ये श्वसनाचा त्रास, खोकला, ताप, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे असणारे रुग्ण आढळल्यास त्यांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात यावे,’ असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी व्यावसायिक डॉक्टरांना दिले आहेत.
पाच एप्रिललाच तसा आदेशही काढण्यात आला. त्यानुसार खासगी व्यावसायिक डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सारीच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून 20 बेड तयार करण्यात आले आहेत. त्याबरोबर त्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.