द. आफ्रिका क्रिकेट मंडळ बरखास्त

सुमार कामगिरी व वर्णद्वेषाचा फटका, टास्क फोर्स नेमणार

जोहान्सबर्ग – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुमार कामगिरी तसेच वाढत चाललेला वर्णद्वेष यांत पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ वादात अडकले होते. अखेर दक्षिण आफ्रिका क्रीडा महासंघ व ऑलिम्पिक समितीने मंडळ बरखास्त केले असून लवकरच सर्व व्यवस्था पाहण्यासाठी टास्क फोर्स नियुक्‍त केले जाणार आहे. आता आयसीसी यावर काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

1969-70 साली दक्षिण आफ्रिका क्रिकेटवर आयसीसीने याच कारणाने बंदी लावली होती. अखेर 21 वर्षांच्या वनवासानंतर बीसीसीआयसह अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्यावरची बंदी उठली व त्यांना पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटची कवाडे खुली झाली. मात्र, तरीही त्यांची मानसिकता बदलली नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून 29 वर्षांनंतर त्यांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदीला सामोर जावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून संघातील खेळाडूंमध्ये वर्णद्वेष वाढत चालला होता. त्यावर खुलेपणाने चर्चाही होत होत्या. मात्र, आजवर त्यांचे वर्तन सुधारेल असा विश्‍वास ठेवत त्यांना सातत्याने संधी मिळत होती. मात्र, परिस्थितीत काहीच बदल होत नसल्याचे लक्षात आल्यावर महासंघ व समितीने मंडळच बरखास्त केले असून सर्व कामकाजाची तसेच वर्णद्वेषी वातावरणाची चौकशी या टास्क फोर्सद्वारे केली जाणार आहे. टास्क फोर्स एक महिन्याच्या कालावधीत आपला अहवाल सादर
करणार आहे.

जागतिक क्रिकेटची सूत्रे हाती असलेल्या आयसीसीकडून आता काय भूमिका घेतली जाणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्याही देशाच्या कामकाजात तेथील सरकारने हस्तक्षेप केला असेल तर आयसीसी त्या देशावर कारवाई करते. आता ही टास्क फोर्सदेखील आयसीसीला सर्व चौकशीची माहिती देणार असून त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

आयपीएलमधील संघांना फटका बसणार

अमिरातीत येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेलाही याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. जर महासंघाने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मंडळाप्रमाणेच बंदीच्या कारवाईत समाविष्ट केले तर त्यांच्या एकाही क्रिकेटपटूला अन्य स्पर्धांमध्येही खेळता येणार नाही. त्यामुळे आयपीएलच्या ज्या संघांनी अशा खेळाडूंशी करार केला आहे तो देखील धोक्‍यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.