साहित्य संमेलनाबाबत लवकरच निर्णय; हेमंत टकले यांची माहिती

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढत असल्याने 94वे साहित्य संमेलन अडचणीत सापडले आहे. परंतु हे संमेलन रेटायचं म्हणून ठरलेल्या तारखेला घ्यायचे, असा हट्ट आम्ही करणार नाही. पुढील 3 दिवसांत संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, साहित्य परिषद, स्थानिक जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभाग यांच्यासोबत लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. त्यानुसार आम्हाला सूचना येतील, अशी माहिती 94व्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी दिली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेमंत टकले म्हणाले, नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनावर सहस्त्र समस्या उभ्या आहेत. स्वतः स्वागताध्यक्ष पॉझिटिव्ह आहेत. फेब्रुवारी महिन्यात राज्यात अचानक रुग्ण संख्येत वाढ झाली. ही नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहिला मिळत आहे. एकीकडे करोना रुग्ण संख्या वाढत आहे तर दुसरीकडे 26, 27 आणि 28 मार्चला संमेलन होणार आहे. यासाठी आमची जय्यत तयारी सुरू आहे. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी स्वतः अध्यक्ष जयंत नारळीकर आणि त्यांची पत्नी यांना पुण्यात जाऊन निमंत्रण दिले आहे.

साहित्य मंडळाकडून साहित्यिक आणि परिसंवादासाठी पाहुण्यांना निमंत्रण देखील लवकरच जातील. हे सर्व सुरू असताना नियोजित तारखेला काय परिस्थिती असेल हे आज सांगता येणार नाही. संमेलन त्या दिवशी घेतले, तर त्यादिवशी उपस्थितांची संख्या मर्यादित असेल. याबाबत ज्या सूचना प्रशासन देईल त्यानुसार आम्ही तयारी करू. आम्ही त्याठिकाणी सॅनिटायझिंग करण्याची व्यवस्था केली आहे. अपेक्षा आहे पुढील 3 दिवसांत योग्य तो निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.