शरजीलच्या केसालाही धक्‍का लावण्याची हिंमत नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई  – शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशचा असल्याचे मुख्यमंत्री सांगत होते. पण त्या शरजील उस्मानीची हिंदुंच्या विरुद्ध उत्तर प्रदेशात बोलायची हिंमत नाही. तो तुमच्या-आमच्या महाराष्ट्रात येतो आणि पुण्यात येऊन बोलून जातो. त्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. हे या सरकारचं हिंदुत्व ते आम्हाला सांगत होते, अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज(बुधवार) आपल्या भाषणात भाजपावर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला. राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी भाजपाला शरजील उस्मानीच्या मुद्द्यावरून उत्तर देत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील सुनावले.

फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात, भारतरत्न नाही मिळाला तरी चालेल पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. तुमचं सरकार तयार झाल्यानंतर त्यांनी पुस्तक काढले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री, आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघाले हे मोठं आश्‍चर्य आहे. संभाजीनगरच्या संदर्भात तर अतिशय हास्यास्पद अशाप्रकारचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे, असे म्हणत शिवसेनेवर तोफ डागली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.