मुंबई : अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनमध्ये मुंबईत अडकलेल्या परप्रांतियांना आपापल्या घरी स्वखर्चाने पोहोचवत आहेत. त्याच्या कामाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. त्याने आतापर्यंत तब्बल 12 हजारांपेक्षा जास्त परप्रांतियांना आपल्या घरी पोहोचवून हजारो कुटुंबासाठी देवदूत बनला आहे. आता पुन्हा एकदा त्याने केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींना त्यांच्या घरी सुखरुपरित्या पोहचवले आहे.
सोनूने केरळमधील या 177 मुलींना विमानाने त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या सर्व मुली एर्नाकुलममधील एका फॅक्ट्रीमध्ये शिवणकाम आणि भरतकाम-विणकामांच काम करतात. या अडकलेल्या मुलींची माहिती भूवनेश्वरमध्ये राहणाऱ्या एका मित्राने सोनूला दिली. त्यानंतर सोनूने यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या मुलींना तेथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. त्याने सरकारकडून भुवनेश्वर आणि कोची विमानतळ काही वेळासाठी सुरु करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर सोनूने बंगळुरुवरुन एक स्पेशल एअरक्राफ्ट मागवून या मुलींना भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले.
‘लॉकाडाऊनमुळे या सर्व मुली केरळमध्ये अडकल्या होत्या, पण आता लवकरच त्या भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचतील. माझ्यासाठी यापेक्षा जास्त आनंद दुसरा कोणताही असू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया सोनूने दिली.
दरम्यान सोनू सूद मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांतील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूशी संवाद साधला होता. सोनूनेही त्यांना उत्तर देत मदतीचे आश्वासन दिले. सोनूने केलेल्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.