सोनियांनी घेतली शिवकुमार यांची कारागृहात भेट

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज तिहार कारागृहात असलेले कर्नाटकचे कॉंग्रेस नेते डी. के शिवकुमार यांची भेट घेतली. त्यांना सोनिया गांधी यांनी पक्षाच्यावतीने पुर्ण समर्थन यावेळी जाहींर केले. त्यांची अटक हा पुर्ण राजकीय द्वेषाचा प्रकार आहे असेही सोनिया गांधी यांनी यावेळी नमूद केल्याचे शिवकुमार यांच्या एका समर्थकाने सांगितले.

57 वर्षीय शिवकुमार यांना ईडीने 3 सप्टेंबर रोजी मनि लॉड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यांना तेथे तिहार तुरूंगात ठेवण्यात आले आहे. आज सकाळी श्रीमती गांधी या तेथे शिवकुमार यांना भेटण्यास गेल्या. त्यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेसच्या सरचिटणीस अंबिका सोनी याहीं होत्या. तसेच डी. के शिवकुमार यांचे बंधु व कॉंग्रेसचे विद्यमान खासदार डी. के. सुरेश हेहीं यावेळी उपस्थित होते. नंतर पत्रकारांना या विषयी माहिती देताना खासदार सुरेश म्हणाले की सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही यावेळी दिली.

केवळ शिवकुमारच नव्हे तर कॉंग्रेसचे अन्य नेतेही सरकारच्या राजकीय द्वेषाचे बळी ठरले आहेत. त्याच्या विरोधात लढण्याची गरज आहे असेही सोनियांनी यावेळी सांगितले. शिवकुमार हे कर्नाटकातील कॉंग्रेसचे सात वेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी गुजरात मधील राज्यसभा निवडणुकीच्यावेळी तेथील 44 कॉंग्रेस आमदारांना कर्नाटकात सुरक्षित आश्रय दिला होता त्याचा राग त्यांच्यावर उगवला जात आहे असा आरोप कॉंग्रेस समर्थकांकडून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.