धार्मिक उन्माद हे पाकचे ठळक वैशिष्ट्य; अल्पसंख्याकांना होतोय त्रास

अमेरिकेच्या मानवाधिकार कार्यकर्त्यांचा निष्कर्ष

वॉशिंग्टन: पाकिस्तानात धार्मिक उन्माद वाढत आहे आणि हा वाढता उन्माद हेच पाकिस्तानचे आता ठळक वैशिष्ट्य ठरत आहे. या उन्मादी संघटनांना पाकिस्तान सरकारचेही पाठबळ आहे. त्यामुळे त्याचा मोठा त्रास तेथील हिंदु, ख्रिश्‍चन, अहमदीया अशा अल्पसंख्याक गटांना सहन करावा लागत आहे, असे पाकिस्तानशी संबंधीत अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमेरिकन सिनेटरांच्या एका बैठकीत नमूद केले.

दक्षिण अशियातील मानवाधिकार स्थिती बाबत अमेरिकन सिनेटरांपुढे आपले म्हणणे सादर करताना त्यांनी ही बाब नमूद केली. हा देश महिलांसाठीही जगातला एक धोकादायक देश ठरला आहे असे त्यांनी म्हटले आहे. ईश्‍वर निंदेच्या नावा खाली तेथे अलिकडच्या काही वर्षांच्या काळात 70 लोकांना ठार मारण्यात आले असून याच आरोपाखाली चाळीस किंवा त्याहून अधिक लोकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकारात अन्य अल्पसंख्य तेथे असाह्य ठरत आहेत. पाकिस्तान हा संपुर्ण देशच तेथील इस्लामिक कट्टरपंथीय आणि लष्करी अधिकारी चालवतात.

त्यांना बाकीच्या लोकांचेही मोठे सहाय्य लाभते. पाकिस्तान हा जगातला एकमेव असा देश आहे की तेथे आपल्याच देशाच्या नागरीकांच्या विरोधात कायदे केले जातात. पाक लष्कराचे समर्थन लाभलेल्या इस्लामिक दहशतवाद्यांनी तेथे हजारा समुहाचे मोठ्या प्रमाणात शिरकाण केल्याचाहीं प्रकार घडला आहे. देशात मानवाधिकाराचे रक्षण करण्यास सरकारनेही उघडपणे असाहयता दर्शवली आहे. असेही या समितीच्या निदर्शनाला आणून देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.