औरंगाबाद – औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिरसाठ यांच्या मुलाची एक कथीत ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये सिद्धांत शिरसाठ एका केटरिंग व्यावसायिकाला हात-पाय तोडण्याची भाषा वापरत असल्याचा दावा केला जात आहे.
आमदार शिरसाट यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2017 मध्ये एका पार्टीची केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना ऑर्डर देण्यात आली होती. ऑर्डरसाठी साडेचार लाख रुपये देण्याचे ठरले. पार्टी झाल्यावर पुढे काही रक्कम शिरसाट यांनी गायकवाड यांना दिली. अनकेदा पैसे मागितले असता काहीतरी डिस्काऊंट कर म्हणत उरलेल्या पैश्यातून 75 हजार रुपये कमी केले. तसेच उरलेले 40 हजार देण्याचे कबूल केले. पण जेव्हा पैसे आणण्यासाठी गायकवाड शिरसाट यांच्या कार्यलयात गेले तेव्हा फक्त 20 हजारच देण्यात आले. त्यानंतर जेव्हा गायकवाड यांनी शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ यांना फोन करून पैसे मागितले असता त्यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणात केटरिंग व्यावसायिक गायकवाड सिद्धांत शिरसाठ यांना पार्टी ऑर्डरमधील राहिलेले 20 हजार रुपये मागत आहेत. तसेच ठरलेल्या रकमेमध्ये 75 हजार रुपये डिस्काउंट दिला असून उर्वरित 20 हजार रुपये मागत आहे. त्यावर सिद्धांत शिरसाठ हे साहेबांनी जेवढे दिले, तेवढे दिले, विषय संपला आता, दिमाक खराब करायचा नाही आता, तू आता डोक्याच्या वर झाला बर का….परत आला तर तिथच हातपाय तोडतो तुझे, असे बोलत असल्याची एक कथित क्लिप व्हायरल होत आहे.