मुंबई – रिया चक्रवर्ती गेल्या वर्षभरापासून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून चर्चेत आहे. अगदी अलीकडे ती “बिग बॉस’मध्येही सहभागी होणार असल्याची खबर होती. रेहा ही “बिग बॉस’ शो चे प्रमुख आकर्षण ठरू शकेल, असा अंदाज असल्यामुळे निर्मात्यांनी तिच्यासाठी मोठी किंमत मोजायचीही तयारी दाखवली आहे, असेही समजले होते.
मात्र, आता या संदर्भात एक वेगळीच माहिती पुढे आली आहे. रेहा चक्रवर्तीने “बिग बॉस 15′ मध्ये सहभागी होण्याची ऑफर नाकरली आहे, असे समजते आहे. 2 ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या “बिग बॉस’च्या नवीन सिझनमध्ये रिया चक्रवर्ती सहभागी होणार नाही, असे आता स्पष्ट झाले आहे.
रिऍलिटी शो मधून पैसा आणि प्रसिद्धी एकाचवेळी मिळवण्यापेक्षा फिल्मी करिअरला पुन्हा एकदा चालना देण्याचा प्रयत्न रेहा करणार आहे, असे समजते आहे. याच संदर्भात ती बॉलिवूड आणि दक्षिणेकडील निर्मात्यांच्या भेटी गाठी घेणार आहे. तिला चांगले सिनेमे मिळण्याची अपेक्षाही आहे.
याशिवाय “बिग बॉस’मध्ये न जाण्यासाठी तिच्याकडे आणखीन एक कारण आहे. सुशांत सिंह प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेत ती अडकलेली आहे. त्यासाठी तिला मध्येच कोर्ट कचेऱ्या कराव्या लागणार आहेत.