निष्ठावंताना डावलून बाहेरून आलेल्यांचा विचार करू नये
नगर – पक्ष वाढविण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. परंतु, आता विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काहीजण ऐनवेळी पक्षात आले आहेत. निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांचा उमेदवारीसाठी पक्षाने विचार केल्यास आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असा सणसणीत इशारा आज दुपारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी राष्ट्रवादीचे निरीक्षक विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील व अंकुश काकडे यांना दिला आहे. राष्ट्रवादी भवन येथे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. पारनेर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले नीलेश लंके हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
त्यामुळे संतापलेल्या व विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सुजित झावरे यांनी पक्षनिरीक्षकांना त्यांचा विचार करू नये, असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
झावरे म्हणाले की, पक्षाचे झाड वाढवण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. परंतु आता झाडाला फळे आली म्हणून ती तोडून त्याचा आस्वाद बाहेरून आलेले व्यक्ती घेणार असतील, तर त्याचा आम्हा सर्व निष्ठावंतांना गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्ष जर अशा बाहेरून आलेल्या इच्छुकांचा विचार करणार असेल, तर आम्हालाही पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही झावरे यांनी दिला.