प्रासंगिक: माझ्या नजरेतील स्मिता…

मृणाल घोळे-मापुस्कर

अष्टपैलू अभिनेत्री म्हणून स्मिता पाटीलचे नाव कायमच रसिकांच्या स्मरणात राहील. आपल्या अभिनयानं स्वत:चा एक अनमोल ठसा स्मिता पाटीलनं सिनेसृष्टीवर उमटवला आहे. पुण्यातील क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट मृणाल घोळे-मापुस्कर या स्मिता पाटीलच्या मोठ्या चाहत्या असून, त्यांनी नुकतीच “असं एखादं पाखरू वेल्हाळ…’ ही शॉर्टफिल्म स्मिता पाटीलला केंद्रस्थानी ठेवून निर्माण केली आहे. एका चाहतीनं 66 व्या जयंतीनिमित्त या महान अभिनेत्रीचं केलेलं हे स्मरण…

स्मिता… स्मिता पाटील… काय आणि किती बोलू मी हिच्याबद्दल? स्मिता हे माझं प्रेरणास्थान आहे. माझा आदर्श आहे. ती माझी ऊर्जा आहे. माझी खूप जवळची मैत्रीण आहे ती आणि कधी कधी तर वाटतं; माझ्यातच स्मिता आहे की काय? खूप वेडी होती स्मिता. मी तिला प्रत्यक्ष कधी अनुभवलं नाही; तिला कधी पाहिलंही नाही. कारण तिनं माझ्या जन्माच्या आधीच या जगाचा निरोप घेतला होता. पण तिचं मन आणि आत्मा तर कायम आपल्याबरोबरच आहे. ती तिच्या पुढच्या पिढीतल्या माझ्यासारख्यांनाही तिचं वेड लावते; म्हणूनच मी तिला वेडी म्हटलं.

स्मिता वेगळीच होती. ती खूप असामान्य होती; तरीही सर्वसामान्यांच्या मनात घर करून होती. तिचं आणि माझं आयुष्य यात मला कुठेतरी एक समान धागा सापडला; म्हणूनच मला ती माझी ऊर्जा वाटते. प्रचंड कौतुक वाटतं मला तिचं! एक काळी-सावळीशी, बारीक चणीची, अगदी साधी इतकी साधी की, घोळक्‍यात उभं राहिल्यावर कोणाची तिच्याकडे नजरही जाणार नाही, अशी मुलगी एक काळ संपूर्ण जगावर; अनेकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवते! तिच्यात किती मोठा स्पार्क असला पाहिजे.

स्मिताला तिच्या सावळ्या रंगाबद्दल प्रचंड न्यूनगंड होता; परंतु पुढे तिच्या याच रंगाबद्दल अनेक ग्लॅमरस नट्यांना हेवा वाटायला लागला. प्रत्येकवेळी आपण स्वतःकडे स्वतःच्या नजरेतून न बघता इतरांच्या नजरेतूनही स्वतःला न्याहाळलं पाहिजे आणि नेमकं स्मिताच्या बाबतीतही हेच घडलं. श्‍याम बेनेगल आणि गोविंद निहलानी यांनी स्मितामधील तो स्पार्क बघितला; त्यामुळे ही आगळी वेगळी स्मिता जगाला गवसली.

स्मिता इतकी खरी होती की, तिच्या सर्वच सिनेमांमधून तिचा खरेपणा जाणवायचा. ती जी भूमिका साकारायची त्या भूमिकेतील पात्रात ती विरघळून जायची. त्यामुळे तिचं काम खूप आतून व्हायचं. वरवरचा अभिनय तिला कधी जमलाच नाही. एखादी थ्री-डी इमेज कशी असते ना; अगदी तशीच होती स्मिता. तिनं कोणतंही पात्र साकारलं तरी खऱ्या आयुष्यातील त्या स्त्रीला वाटावं की; स्मिता ही जणू आपल्यातीलच कोणी एक आहे. कोणतीही भूमिका साकारताना तिचं संपूर्ण शरीर बोलायचं.

स्मिताच्या प्रत्येक सिनेमातून तिची समाजाप्रती, पीडित स्त्रियांसाठीची तळमळ वेळोवेळी जाणवते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मुंबईच्या विमेन्स सेंटरमधून पीड़ित महिलांसाठी कामही करत असे. स्मिताची जिद्द, तिचा हट्टी स्वभाव हा ही वेड लावतो. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची तिची धडपडही बरेच काही शिकवून जाते. तिचे डोळे हेही तिचं एक बलस्थान होतं. ती नेहमी डोळ्यांतून जे काही बोलायची ते फार विलक्षण होतं. तिचे ते ठाम, निश्‍चयी, कणखर, खंबीर परंतु तितकेच प्रेमळ डोळ्यांमधील भाव बरंच काही सांगून जात असत. तिचे डोळे सर्वांनाच नजरकैद करून ठेवायचे.

स्मिताचं एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये रस घेणं लक्षणीय होतं. डान्स, अभिनय, लिखाण, गायन, खेळ हे सर्वच कला गुण तिला अवगत होते. ती हे सर्व एकाचवेळी कसं निभावत असेल, याचं नेहमीच कमालीचं कुतूहल वाटतं. ती इतकी वेगळी होती की, तिचे विचार तिच्या नंतरच्याही पिढ्या फॉलो करतात. या गोष्टीवरून जाणवतं की तिचे विचार किती उच्च व पुढारलेले होते. यामुळे स्मिता ही मला व्यक्‍तीपेक्षा एक विचारच वाटते. स्वतःचे अस्तित्व शोधायला निघालेल्या प्रत्येक स्त्रीमध्ये, तिच्या मनामध्ये स्मिताचं अस्तित्व कायम आहे.

स्मिताच्या समांतर चित्रपटातून व्यावसायिक चित्रपटात झालेलं पदार्पण यावर अनेकांनी नापसंती दर्शविली होती. परंतु मला तिच्या या गोष्टीचंही कौतुकच वाटतं; कारण स्मिताला अनेक नवनवीन गोष्टींची अनुभूती घेण्याची आवड होती; अशावेळी तिला काहीतरी वेगळं करून बघावंसं वाटलं, तर त्यात वावगं ते काय? तिने विवाहित पुरुषाशी लग्न केलं, यावरून स्मितावर अनेकांनी टीका केली. पण कोणावर प्रेम हे काही ठरवून होत नसतं ना? तिनं त्या व्यक्‍तीवर जिवापाड प्रेम केलं. उलट तिचं धाडस व प्रामाणिकपणा हा की, तिनं हे जगापुढे मान्यही केलं.

तिच्यातील या सर्व आगळ्या-वेगळ्या गोष्टींमुळेच मी स्मितामध्ये एकरूप झाले. मला आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटायला लागलं की, मी स्मिताचा एखादा फोटो तासन्‌तास न्याहाळत बसते, तिचं एखादं अर्थपूर्ण गाणं, तिचा सिनेमा बघते, तिचे डायलॉग ऐकते आणि मग असा काही चमत्कार होतो की, मी दुप्पट एनर्जीनं कामाला लागते. माझ्यात अशी काही ऊर्जा संचारते की, आलेली सगळी मरगळ कुठेतरी लांब पळून जाते. म्हणूनच स्मिताला मी माझा ऊर्जास्रोत मानते व “सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे…’ हे तिचं गाणं गुणगुणत माझं काम सुरू ठेवते.

Leave A Reply

Your email address will not be published.