पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाच्या उत्पन्नात दरवर्षी वाढ होताना दिसून येत आहे. मात्र, अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात विभाग मागे आहे. 2021-22 या आर्थिक वर्षांत 11 कोटींचे उद्दिष्ट दिले असताना या विभागाने 12 कोटी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. परंतु कारवाई केवळ 118 अनधिकृत फलकांवर करण्यात आली आहे.
नेत्यांचे वाढदिवस असो, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक यासह कोणतेही कार्यक्रम असो जाहिरात फलक लावण्याची सध्या मोठी क्रेझ आहे. गुंडांच्या वाढदिवसांपासून ते श्वानाच्या वाढदिवसांचे फलकही शहरात चर्चेचे विषय ठरतात. अनेक राजकीय पुढारी आणि व्यावसायिक परवाना न घेताच अनधिकृत फलक लावत असतात. एकाच परवाना नंबरवर अनेक जाहिरात फलक असण्याची शक्यताही आहे. यापूर्वी असे प्रकार उघडकीस आले आहेत.
पाच वर्षांत उत्पन्न तिप्पट
आकाश चिन्ह विभागाचे गेल्या पाच वर्षांतील उत्पन्न तिप्पट झाले आहे. यामध्ये 2017-18 मध्ये 3 कोटी 79 लाख, 2018-19 मध्ये 3 कोटी 98 लाख, 2019-20 मध्ये 6 कोटी 11 लाख, 2020-21 मध्ये 4 कोटी 20 लाख तर 2021-22 मध्ये 12 कोटी 50 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. करोनाच्या महामारीमध्ये उत्पन्नात घट झाली होती. मात्र, 2021-22 या आर्थिक वर्षांत आकाश चिन्ह विभागाला घसघशीत असे उत्पन्न मिळाले आहे.
जाहिरात फलक लावण्यासाठी इंदौर पॅटर्न
शहराच्या सौदर्यांत बाधा न येता जाहिरात फलक उभारणे आणि उत्पन्न वाढीसाठी आकाश चिन्ह विभागाच्या वतीने आगामी काळात विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी मध्य प्रदेशामधील इंदौर पॅटर्न राबविण्यात येणार आहे. इंदौर पॅटर्नप्रमाणे महापालिका प्रशासनाने शहरातील निगडी ते दापोडी आणि औंध ते रावेत हे बीआरटी मार्ग निश्चित केले आहेत. या दोन प्रमुख रस्त्यांवर महापालिकेच्या 42 जागेत हे जाहिरात फलक उभारणार आहे. यामाध्यमातून आकाश चिन्ह परवाना विभागाचे उत्पन्न वाढ चांगली होईल, असा होरा महापालिका प्रशासनाचा आहे.
387 अर्ज प्रलंबित
शहरात सध्यस्थितीत 2 हजार 141 मोठे जाहिरात फलक अधिकृत आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी आकाश चिन्ह विभागाने कंबर कसली आहे. जाहिरात फलक लावण्यासाठी अ क्षेत्रीय कार्यालयात 67, ब मध्ये 86, क मध्ये 27, ड मध्ये 12, इ मध्ये 160 तर फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत 35 असे 387 अर्ज आहेत. या अर्जावर अद्याप निर्णय झाला नाही.
केवळ 2142 फलक अधिकृत
होर्डिंग आणि फ्लेक्सने गजबलेल्या या शहरात सद्यःस्थितीत केवळ 2 हजार 141 मोठे जाहिरात फलक अधिकृत आहे. परवानाधारक फलकांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत उत्पन्न जमा होत आहे. दुसरीकडे शहराच्या प्रत्येक चौकात आणि प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक दिसून येत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात फक्त 118 फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.
आकाश चिन्ह विभागात मी आल्यापासून अनधिकृत जाहिरात फलकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. बाह्यजाहिरात धोरण निश्चित करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षांत 11 कोटींचे टार्गेट असताना साडेबारा कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. आगामी आर्थिक वर्षांत 16 कोटी 31 लाखांचे टार्गेट देण्यात आले आहे. अनधिकृत फलकांवर कारवाई पुन्हा सुरू करणार आहोत.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, आकाश चिन्ह परवाना विभाग