skirmish in Kanker district of Chhattisgarh – छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीत एक पोलीस हवालदार शहीद झाला तर एक नक्षलवादी ठार झाला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. छोटेबेठिया पोलीस स्टेशन अंतर्गत हिदूर गावाजवळील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक झाली.
हिदूर जंगलात नक्षलवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांकडून मिळाल्याने त्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
यात शहीद झालेल्या पोलीस जवानाचे नाव कॉन्स्टेबल रमेश कुरेठी असे आहे. तसेच घटनास्थळावरून एका नक्षलवाद्याचा मृतदेह आणि एके-47 रायफल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत नक्षलवाद्याची अजून ओळख पटलेली नाही. या परिसरात आणखीही काही नक्षलवादी लपले असल्याचा संशय असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.