भारत-चीन चर्चेची सहावी फेरी

पूर्वीच्या चर्चेतील निर्णयांच्या अंमलबजावणीवर भर

नवी दिल्ली – पूर्व लडाख सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभुमीवर भारत आणि चीनच्या उच्चस्तरिय प्रतिनिधींमध्ये चर्चेची पुढची फेरी आज झाली. यापूर्वी लष्करी पातळीवर झालेल्या चर्चेच्यावेळी झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच गैरसमजूत टाळून प्रत्यक्षात स्थैर्य कायम राखण्यावर आजच्या चर्चेमध्ये भर देण्यात आला.

सीमा भागातील चर्चा आणि समन्वयासाठी नेमण्यात आलेल्या कार्यकारी यंत्रणेच्या चौकटीत घेण्यात आलेल्या व्हर्च्युअल चर्चेमध्ये आतापर्यंतच्या ‘एलएसी’वरील स्थितीचा आढावा घेण्यात आला आणि सकारात्मकरितीने त्याचे मूल्यमापनही करण्यात आले.

वरिष्ठ कमांडरांच्या यापूर्वीच्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त पत्रकार प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेल्या मुद्दयांची अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

21 सप्टेंबर रोजी दोन्ही बाजूंच्या सेना कमांडरनी सुमारे 14 तास बैठक घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी तणाव कमी करण्यासाठी काही निर्णय जाहीर केले होते. त्या निर्णयांमध्ये सीमा भागात अधिक सैन्य पाठविणे थांबविणे, एकतर्फी परिस्थिती न बदलणे आणि यापुढे प्रकरण अधिक जटिल होऊ शकेल अशी कोणतीही कृती करणे टाळणे यांचा समावेश आहे.

20 सप्टेंबरपासून झालेल्या बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावाही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या बाजूने द्विपक्षीय बैठक झाली होती. त्यावेळीही लडाख सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.