कराड -कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेले उपजिल्हा रूग्णालयातील सहा करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना गुरूवारी घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये पाच परिचारिका या उपजिल्हा रूग्णालयातील असून एक वनवासमाची येथील आहे.
कराड शहरातील कोव्हिड सेंटर असणाऱ्या स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील आठ जणांना करोनाची बाधा झाली होती. यामध्ये पाच परिचारीकांचा समावेश होता. हे रूग्णालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तेथे शहरासह तालुक्यातील अनेक नागरिक विविध तपासण्यांसाठी येत असतात. तेथील कोव्हीड सेंटरमुळे इतरांना धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे तेथील कोव्हिडची मान्यता रद्द करावी अशी मागणी पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना यांच्याकडून होत होती. त्याची दखल घेत तेथील कोव्हिण सेंटर रद्द करून तेथील रूग्णांना सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले. 6 रुग्णांची 14 व 15 दिवसानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे 6 करोनाबाधित रुग्ण निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. 6 कोरोना मुक्त झालेल्यांमध्ये 5 परिचारिका तर वनवासमाची येथील 10 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. करोना मुक्त झालेल्या 6 जणांचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगिता देशमुख, सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक अमित चव्हाण, वैद्यकीय प्रमुख व्यकंटेश मुळे या सर्वांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.