रेठरे बुद्रुक -करोना महामारीमुळे गेली दोन महिने वारंवार दूध संकलन बंद राहिल्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यापेक्षा सातारा जिल्ह्याचा दूध दर कमी असल्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या दूध उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून तसेच सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने रेठरे बुद्रुक येथील दूध संस्था चालकांनी दूध उत्पादकांना वाढीव दूध दर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्राहकांनाही निर्जंतुकीकरण केलेले पॅकिंग दूध हमी भावात देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील दूध उत्पादक व ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
रेठरे बुद्रुक ता. कराड येथे एक करोना बाधित रुग्ण सापडला होता. त्यामुळे संपूर्ण गाव लॉक डाऊन करण्यात आले होते. दोन महिन्यांपासून गावातील सर्व व्यवहार बंद होते. दूध संकलन केंद्रे बंद होती. त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. दूध व्यवसायासाठी लाखो रुपयांची कर्जे काढून कित्येक तरुण या व्यवसायाकडे वळले आहेत. दूध संकलन बंद झाल्यामुळे कर्जाचे हप्ते, जनावरांचे खाद्य आदी खर्च तसेच घरखर्च भागवणे मुश्किल झाले आहे.
दूध उत्पादक अडचणीत सापडलेला आहे. तसेच सातारा जिल्ह्यात दुधाचा दरही सांगली जिल्ह्यापेक्षा कमी आहे. रेठरे बुद्रुकच्या हाकेच्या अंतरावर सांगली जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात म्हैस दुधाचा दर 39 रुपये फॅटनुसार आहे. तर तोच दर सातारा जिल्ह्यात 36 रुपये 30 पैसे आहे. अशाप्रकारे लीटर पाठीमागे 3 रुपयांचा तोटा दूध उत्पादकांना सहन करावा लागत आहे.
सांगली जिल्ह्यातील काही दूध संस्था रेठरे बुद्रुकपासून काही अंतरावर दूध संकलन करतात. परंतु, येथील दूध संस्थाना शासकीय नियमानुसार जादा दर मिळत असताना सांगली जिल्ह्याच्या दूध संस्थाना दूध घालता येत नाही. अशाप्रकारे दोन्ही जिल्ह्यात दूध दराची तफावत आढळून येत आहे. दूध उत्पादक शेतकरी तसेच दूध संकलन करणाऱ्या डेअरी व्यावसायिकांना या दराचा फटका बसत आहे.
रेठरे बुद्रुक येथील दूध उत्पादकांना करोना महामारीमुळे झालेल्या तोट्यातून सावरता यावे त्यांना प्रोत्साहन द्यावे व दूध संकलनही वाढावे या उद्देशाने येथील दूध संकलन संस्थानी सामाजिक बांधिलकी जोपासत दूध उत्पादकांना मदतीचा हात दिला आहे. या निर्णयाने दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.