लोणी काळभोर- कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील, गेल्या काही दिवसांत प्रवास केल्याची पार्श्वभूमी असलेल्या सहा जणांना पुण्यातील नायडू रुग्णालयात पाठवण्यात आले असून तेथील वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली.
दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी एक मोठा धार्मिक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात कदमवाकवस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत परिसरातील तिघे जण सहभागी झाले होते, तसेच या परिसरात चेन्नई येथून 2, तर नेपाळ येथून 1 जण आलेला आहे. या सर्वांची तपासणी करण्यात आली असून, त्यांना कोणताही त्रास होत नाही. मात्र, सावधगिरीचा उपाय म्हणून या सहा जणांना पुण्यातील नायडू रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर कदमवाकवस्ती हद्दीत वैष्णवी हॉस्पिटलचे डॉ. रतन काळभोर व त्यांचे सहकारी नागरिकांची तपासणी करीत आहेत. त्यांना तपासणीत काही संशयित आढळून आले. त्यांतील 3 जण दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांत सहभागी झाले होते, तर 2 जण चेन्नई येथून व नेपाळ येथून 1 जण आलेला आहे असे समजले.
डॉ. रतन काळभोर यांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधला. व वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांना ही माहिती दिली. डॉ. जाधव यांनी सर्वांची तपासणी केली. त्यावेळी आज अखेर त्यांना कोणताही त्रास होत नाही, हे लक्षात आले आहे; पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून 6 जणांना नायडू रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.