विभागीय व्यवस्थापक राजेश इंगळे यांची माहिती
पुणे – करोना विषाणूच्या परिस्थितीत बॅंक ऑफ इंडियाच्या गृहकर्ज, वाहन कर्जफेडीस मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती बॅंकेचे विभागीय व्यवस्थापक राजेश इंगळे यांनी बुधवारी दिली.
रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेप्रमाणे बॅंक ऑफ इंडियाने गृहकर्ज, वाहनकर्ज इत्यादी रिटेल कर्जांचे मार्च, एप्रिल, मे महिन्यांचे हप्ते पुढे ढकलले आहेत. तीन महिन्यांचे हप्ते नंतर भरण्याची सूट देण्याव्यतिरिक्त बॅंक ऑफ इंडियाने करोना तत्काल सहाय्य आणि करोना वैयक्तिक कर्ज योजना जाहीर केल्या आहेत.
करोना तत्काल सहाय्य योजने अंतर्गत व्यवसायासाठी घेतलेल्या कॅश क्रेडिट कर्जाच्या 20 टक्के पर्यायी रक्कम 7.25 टक्के ते 7.95 टक्के व्याजदराने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, 6 महिन्यांनंतर 18 मासिक हप्त्यात परतफेड करायची आहे.
करोना वैयक्तिक कर्ज योजनेत पगारदार ग्राहकाला पगाराच्या तिप्पट रक्कम वैयक्तिक कर्ज म्हणून मिळू शकते. गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकाला मालमत्तेच्या किमतीच्या 25 टक्के इतकी रक्कम वैयक्तिक कर्ज म्हणून मिळू शकते. या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज 7.25 टक्के दराने उपलब्ध असेल.
या दोन्ही योजनांसाठी प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही, असे इंगळे यांनी सांगितले. वैयक्तिक कर्ज 48 तासांत, व्यावसायिकांना 72 तासांत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ग्राहकांनी बॅंक ऑफ इंडियाच्या नजीकच्या शाखेत कागदपत्रे सादर केल्यास तातडीची मदत मिळू शकते, अशी माहिती राजेश इंगळे यांनी दिली.