श्रीरामपूर (प्रतिनिधी )- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहाशे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करतेवेळी कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदान करावे, या संदेशाचे पत्र लिहून मतदान जनजागृतीचा संदेश दिला.
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ म्हणाले, विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी केलेला उपक्रम स्तुत्य आहे. विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलामार्फत भावी मतदार पिढी प्रबळ करण्याचे कार्य करण्यात आले. आपण सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात राहतो. मतदान करताना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करून लोकशाही दृढ केली पाहिजे.
मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून न मानता आपण मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना लिहिलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले. मतदान करण्याबाबत सर्वांना प्रतिज्ञा देण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंखे , मनीषा उंडे, राजश्री तासकर, आशिष गायकवाड, शंकर बाहुले आदी शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सुजित दुशिंग यांनी केले.