लखनौ – उत्तरप्रदेशच्या अयोध्येत शुक्रवारी काळीज हेलावणारी घटना घडली. शरयू नदीत पवित्र स्नानासाठी गेलेल्या एकाच कुटूंबातील 6 सदस्यांचा बुडून मृत्यू झाला. आग्रा जिल्ह्यातील 15 सदस्यांचे कुटूंब पवित्र स्नानासाठी अयोध्येतील एका घाटावर गेले.
त्या कुटूंबातील एक सदस्य नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी इतरांची धांदल उडाली. त्या गोंधळात कुटूंबातील 12 सदस्य पाण्यात पडले. त्या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. बचाव पथकांना 6 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, इतर 6 जणांना वाचवण्यात अपयश आले. त्यांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले.
आणखी तिघे बेपत्ता असून त्यांचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरू होता. अयोध्येतील दुर्घटनेमुळे संबंधित कुटूंब राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले.