पिंपरी -अपहरण झालेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीची पोलिसांनी सुटका केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. त्यांनी रडत-रडत पोलिसांचे आभार मानले आणि साहेब, आम्ही तुमचे (पोलिसांचे) उपकार मरेपर्यंत विसरणार नाही, असे म्हणत आपल्या भावनांना अश्रूंसोबत वाट मोकळी करून दिली.
छकुली (नाव बदलले आहे) चे शनिवारी (वय 23) दुपारी पाच जणांनी कट रचून अपहरण केले. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई, वडिलांनी परिसरात शोध घेतला मात्र मुलगी सापडत नसल्याने त्यांनी थेट चिखली पोलीस ठाणे गाठले. चिखली पोलिसांच्या मदतीला, गुन्हे शाखा युनिट एक, युनिट दोन, युनिट तीन, युनिट पाच, दरोडा विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक असा भलामोठा फौजफाटा देण्यात आला.
शेकडो पोलीस छकुलीच्या शोधात रवाना झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासणे, तांत्रिक विश्लेषण करणे, खब-यांच्या आधारे माहिती घेणे अशा अनेक पातळ्यांवर तपास सुरू झाला. छकुलीचे आई-वडील कर्नाटक राज्यातील आहेत. त्यांना मराठी देखील नीट बोलता येत नाही. शहरात येऊन अवघे चार महिने झाले होते. रोजंदारीला कशीबशी सुरुवात झाली होती. अशा वेळी अचानक मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंब सैरभैर झाले होते. पण पोलीस आपल्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. प्रत्येकजण जीवाचे रान करून प्रयत्न करीत आहेत, हे छकुलीचे आई-वडील प्रत्यक्ष पाहत होते. शेवटी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवली आणि छकुलीची सुखरूप सुटका केली.
पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी सांगितले की, परिसरातील व्यापारी, दुकानदारांनी तपासासाठी खूप चांगले सहकार्य केले. सर्वांनी मध्यरात्री दुकाने उघडून सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी मदत झाली. या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचा-याने तहान भूक विसरून काम केले आहे. आम्ही मुलीला सुखरूप सोडवू शकलो याचा आनंद आहे.