पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कूल कॅब आणि टॅक्सीच्या भाडे दराच्या प्रश्नाबाबत आरटीओ कार्यालयातील बैठक संपल्यावर अधिकारी सभागृहाच्या बाहेर पडताच बैठकीसाठी आलेल्या दोन संघटनांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्याचे रूपांतर शिवीगाळ आणि त्यानंतर हणामारीत झाल्याने आरटीओ कार्यालयात एकच गोंधळ उडाला. सिंघम स्टाइल खुर्च्या उचलून, टेबलावर हात मारून धक्काबुक्की करत मारामारीला सुरवात झाल्याने तणावाचे वातावरण होते. दरम्यान, आरटीओच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले.
जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कूल कॅब- टॅक्सीच्या दराबाबत झालेल्या बैठकीत एकमत झाले नाही. त्यानंतर काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आरटीओ कार्यालयात बैठक घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार शुक्रवारी (दि. 23) आरटीओच्या कार्यालयात ही बैठक बोलविण्यात आली.
त्या वेळी आरटीओचे अधिकारी अनंत भोसले, सुजित डोंगरजाल यासह संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक संपवून अधिकारी बाहेर पडल्यानंतर कूल कॅब- टॅक्सीच्या दराबाबत संघटनांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्याचे रूपांतर धक्काबुक्की आणि नंतर हणामारीत झाले. प्रतिनिधींनी कार्यालयातील टेबलावरील काच फोडून खुर्च्या तोडून कार्यालयाचे नुकसान केले.
भांडणाची माहिती मिळताच भोसले आणि डोंगरजाल अधिकाऱयांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्या वेळी काही कार्यकर्ते घोषणाबाजी देत बाहेर पडले. त्यानंतरही पुन्हा वाद सुरू झाल्यावर अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. बंडगार्डन पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, बैठक संघटनेची होती, त्यामुळे प्रत्येक संघटनेचा एक प्रतिनिधी उपस्थित पाहिजे. त्यामुळे संघटनेचा प्रतिनिधी नसताना अन्य व्यक्ती बैठकीत कसे काय बसतात, यावरून हा वाद झाल्याचे घटनास्थळी असलेल्या व्यक्तींनी सांगितले.
आम्हाला संघटनांचे मध्यस्थ म्हणून ही बैठक घेण्यास सांगितले होते. कूल कॅब- टॅक्सी दराबाबत संघटनांचे एकमत होत नसल्यामुळे ही बैठक आरटीओ कार्यालयात घेण्यात आली होती; परंतु बैठक संपल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर आतमध्ये कोणत्या कारणावरून बाचाबाची झाली, याबाबत आम्हाला माहिती नाही. मात्र, कार्यालयात अशाप्रकारे तोडफोड करणे चुकीचे आहे. याबाबत आम्ही पोलिसांना कळवले आहे. पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत.
– अनंत भोसले, आरटीओ अधिकारी