मुंबई – मुंबईतील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक केली. या आंदोलनाने एकच खळबळ उडाली. याच प्रकरणात आता पोलिसांवरही कारवाई होताना दिसत आहे. गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर यांना आता निलंबित करण्यात आले आहे.
सिल्वर ओकवरील हल्ल्या प्रकरणात गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर आता राजभर यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवले असून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
शरद पवार यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीच्या घरावर इतक्या मोठ्या संख्येने जमाव जमतो आणि हल्ला करण्यात येतो हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणा, पोलीस यांचं फेल्युअर असल्याचं म्हटलं गेलं. ज्या ठिकाणी हल्ला होतो त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पोहोचतात मग पोलीस का नाही पोहोचू शकत असाही प्रश्न उपस्थित झाला.