मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे ऍक्शनमोडवर आले आहेत. गेले दोन दिवस सातत्याने बैठका घेत आहेत. आज रविवारी त्यांनी पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. यावेळी त्यांनी काही सूचना देखील दिल्या आहेत. या बैठकी वेळी राज्याचे महाधिवक्ता आणि सरकारी वकील देखील उपस्थित होते.
दिलीप वळसे-पाटील यांनी गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्यासह पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली. दरम्यान, आज देखील त्यांनी बैठका घेतल्या. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे आज सकाळी दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर आले. यावेळी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विशेष सरकारी वकील प्रदीर घरत देखील या बैठकीला उपस्थित होते.
तसेच, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, नवीन पोलीस उपायुक्त निलोत्पल, दिलीप सावंत उपस्थित होते. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते संदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समजते. सदावर्तेंना जामीन मिळू नये यासाठी कायदेशीर पुरावे योग्य पद्धतीने मांडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.