पब्जीचे भारतात स्पेशल गेमसह परतण्याचे संकेत; यावेळी चिनी कंपन्यासह कोणतीही भागीदारी नाही!

भारतातून एका महिन्याची एक्झिट घेतल्यानंतर आता पब्जी कॉर्पोरेशनने भारतात पब्जी मोबाईलच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. भारतीय वापरकर्त्यांसाठी एक स्पेशल गेमही लाँच करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे पब्जी नवीन गेमसाठी कोणत्याही चिनी कंपन्यांशी भागीदारी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पब्जी कॉर्पोरेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लवकरच पब्जी मोबाईल भारतात सुरू होईल. यासाठी कंपनी भारत सरकारच्या डेटा पॉलिसीचे संपूर्णपणे पालन करेल.

पब्जीने भारतीय गेमिंग उद्योगात 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचीही घोषणा केली आहे. कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की त्याची मूळ कंपनी क्राफ्टन इंक भारतात 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक भारतातील खेळ, ई-स्पोर्ट्स, करमणूक आणि आयटी उद्योगांसाठी आहे.

पब्जी कॉर्पोरेशनने भारतातील कार्यालयासाठी कॉर्पोरेट डेव्हलपमेंट डिव्हिजन मॅनेजर या पदाकरिता अर्ज मागविले असून किमान पाच वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

सप्टेंबरच्या सुरूवातीस, डेटा सुरक्षेसाठी 200 गेमिंग ऍप्ससह भारतात पब्जी मोबाईलवरही बंदी घातली गेली होती. आता कंपनीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे, तथापि पब्जी मोबाईलच्या भारतात सुरू होण्याच्या अचूक तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.