पुणे – करोनाच्या संकटाने अनेक नागरिकांच्या मनात भीती आणि नैराश्याचा अंधार दाटला होता. तो दूर करणाऱ्या दीपोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. सूर्यास्तावेळी गाय आणि वासराच्या पूजनाने दिवाळीला सुरुवात झाली असून, गुरुवारी घरोघरी पहिला दिवा लागला.
भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला होता. फटाक्यांची आतषबाजी, फराळाची मेजवानी, आनंद आणि उत्साहात देशभरात दिवाळी साजरी होते. गुरुवारी दिवाळीला प्रारंभ झाला. यानंतर शुक्रवारी धनत्रयोदशी, शनिवारी लक्ष्मीपूजन, सोमवारी बलिप्रतिपदा (दीपावली पाडवा) आणि भाऊबीज साजरी होणार आहे.
वसुबारसेपासून दीपावलीची सुरुवात होते. गुरुवारीदेखील शहराच्या मध्यवर्ती पेठांसह उपनगरांतील भागांत सायंकाळी गाय आणि वासराची पूजा करण्यात आली. पूजेनंतर गायीला ओवाळून गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण केला. दरवर्षी विविध चौक, सोसायट्यांमध्ये वसुबारसेचे आयोजन केले जाते. यंदा मात्र ठराविक ठिकाणीच पूजनाचे आयोजन केले होते.