मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे.
यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात विचार जुळले तर भाजप मनसे युती शक्य असल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. अमित ठाकरे यांची गुरुवारी पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यावर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशामुळे हिंदुत्वाला बळकटी मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, यावेळी ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या ध्वजाचं राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आहे. पूर्णपणे भगव्या रंगाच्या या ध्वजावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता, शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” हे शब्द या राजमुद्रेवर आहेत.