नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान स्थित जैश ए महंमद यांनी आत्मघाती दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट आखत आहे. त्यामुळे जम्मू काश्मिरला अतिसर्तकतेचा आदेश देण्यात आला आहे. हा हल्ला दिल्लीतही होऊ शकतो, असा इशारा काश्मिर पोलिस आणि गुप्तचर खात्याच्या सुत्रांनी दिला आहे.
जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझर आणि त्याचे सहकारी भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी उताविळ झाले, अशा आशयाचे जैशच्या एका कमांडरचे दूरध्वनीवरील संभाषण गुप्तचर खात्याने पकडले आहे.
जैशच्या पाच अतिरेक्यांना नुकतेच श्रीनगरमध्ये पकडण्यात आले. त्यांच्या चौकशीत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला स्फोटांची मालिका घडवण्याच्या सुचना त्यांना पाकिस्तानातील त्यांच्या जहाल विचारसरणीच्या म्होरक्यांन दिला आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटवली असून ऐजाझ अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तीयाज विकला, दाहोल गोजरी आणि नासीर मीर अशी त्यांची नावे आहेत. ते पाकिस्तानातील संघटनेच्या म्होरक्यांच्या संपर्कात असत.
या पाचजणांनी हजरतबाल येथे दोन बॉम्ब फेकले होते. त्यांनी हल्ल्याच्या तयारीची ही रंगीत तालीम केली होती. पाकिस्तानी अतिरेक्यांसह जैशचे अतिरेकी अजूनही काश्मिरात आहेत. त्यांनी मोठ्या हल्ल्याची तयारी केली आहे, अशी आमची माहिती आहे. त्यांचे टार्गेट श्रीनगर किंवा अगदी दिल्लीही असू शकते, असे काश्मिरातील एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
गुप्तचर खात्याच्या अहवालात मौलाना मसूद अझर याला अलिकडे जैशच्या मुख्यालय असणाऱ्या मारकेझ सुभानल्ला येथे आलेले पाहण्यात आले होते, असे गुप्तचर खात्याच्या अहवालात म्हटले आहे. मरकेझ हे तीन एकर क्षेत्रात विस्तारले असून तेथे नव्याने भरती केलेले 600 दहशतवादी आहेत. त्यांना तेथून पाकव्याप्त काश्मिरमध्ये नेऊन लष्करी प्रशिक्षण देण्यात येते.
गेल्या वर्षी अझहर हा गंभीर आजारी होता. त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्याविरूध्द इंटरपोलची नोटीस जारी केली असल्याने त्याच्या बाबत पाकिस्तान सरकार मौन बाळगून आहे.