सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदानाच्या मुख्य भूमिका असलेला “मिशन मंजू’ पुढच्या वर्षी 13 मे रोजी रिलीज होणार आहे. रॉनी स्क्रूवाला, अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांनी “मिशन मंजू’ची निर्मिती केली आहे. शंतनू वागचीचे डायरेक्शन असलेल्या “मिशन मंजू’मध्ये प्रेक्षकांना चक्क हेरगिरीच्या थ्रिलचा आनंद घेता येणार आहे.
सिनेमाचे कथानक 1970 सालातील असणार आहे. ही एक सत्यघटना आहे. या कथेवर कन्नडमध्ये “अंजनी पुत्र’ आणि तेलगूमध्ये “गीता गोविंदम’ नावाने सिनेमे येऊन गेले आहेत. त्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा भारतीय गुप्तहेर संस्था “रॉ’चा एजंट म्हणून दिसणार आहे.
या रॉ एजंटने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या कामगिरीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कायमस्वरूपी बिघडले होते. दक्षिणात्य स्टार रश्मिका मंदाना या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिकाने या सिनेमातील आपला फर्स्ट लुकदेखील रिलीज केला आहे. कन्नड आणि तेलगूमध्ये या कथेची पुनरावृत्ती होऊन गेली असल्यामुळे रश्मिका मंदाना या कथेशी चांगलीच परिचित होती. त्यामुळेच तिने हिंदीतील पदार्पणासाठी “मिशन मंजू’ला लगेच होकार दिला.