“एक व्हिलन’ या चित्रपटात एकत्र झळकलेली सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख ही जोडी पुन्हा एकदा “मर जावा’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. विशेष म्हणजे रितेश या चित्रपटामध्ये देखील व्हिलन प्रमाणे खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर, सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात नायकाच्या भुमिकेत असेल.
गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच सिद्धार्थ मल्होत्राची एन्ट्री होते. त्यात त्याच्या प्रेमाचा प्रवास दाखविण्यात आला आहे. मात्र प्रत्येक प्रेमकथेमध्ये एखादा व्हिलन हा असतोच, त्याप्रमाणे रितेशची ट्रेलरमध्ये एन्ट्री होते. या ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणावर ऍक्शन सीनचा भरणा करण्यात आला आहे. त्यासोबतच रोमान्स आणि उत्तम संवादांचा तडका दिला आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश, राकुल प्रीत सिंह आणि तारा सुतारिया हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे कथानक प्रेमकथेवर आधारित असून चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले आहे. तर निर्मिती भूषण कुमार, निखिल अडवाणी, दिव्या खोसला-कुमार, कृष्णा कुमार यांनी केली आहे.