राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वाहतूक विभागाचा पुढाकार
पुणे – इंटरनेट आणि मोबाइलमुळे ई-कॉमर्स क्षेत्र मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरात वाढत आहे. हे काम करणाऱ्या लोकांना पुरेसे कौशल्य नसल्यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होण्याचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वाहतूक विभागाने (एनएससी) या क्षेत्रातील कौशल्य वाढविण्याचे मोहीम हाती घेतली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे महामंडळाला वाटते.
एनएससी याकरिता फ्लीप कार्टसारख्या ई- कॉमर्स कंपन्यांच्या शाखाशी सहकार्य करून कौशल्य विकासाचा कार्यक्रम तयार करीत आहे. ई- कॉमर्स संबंधातील तंत्रज्ञान या कर्मचाऱ्यांना अवगत करण्याबरोबरच ग्राहकांशी नम्रपणे कसा व्यवहार करावा, एखादी अडचण निर्माण झाल्यास ती कशी सोडवावी याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सध्या यासाठी आठ तासांचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. स्थानिक पातळीवरील कर्मचारी या प्रशिक्षणाचा उपयोग करून स्वतःचे कौशल्य वाढू शकतात. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना आपले काम चांगले करता येईल. त्याचबरोबर हे प्रशिक्षण घेतल्यानंतर संबंधित कंपन्यात काम उपलब्ध होऊ शकणार आहे.
वस्तूच्या स्थळापासून ते ग्राहकापर्यंत अनेक घटक कार्यरत असतात. या ठिकाणी इंटरनेट आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याची माहिती या वेळी देण्यात येणार आहे. स्थानिक वाहतुकीचे नियमही कर्मचाऱ्यांना शिकविले जाणार आहेत.
भविष्यात वाढणाऱ्या उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात अनौपचारिक पद्धतीने काम केले जाते. कर्मचारी कुशल असल्यानंतर हे क्षेत्र औपचारिक होण्यास मदत होईल व त्याचबरोबर रोजगार निर्मिती होईल.
– रामानुजन, एनएससीचे पदाधिकारी