नवी दिल्ली – सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) प्रमुख संजयकुमार मिश्रा यांना तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ अयोग्य असल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ती रद्द केली. यावरून ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगाविला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ईडीचे संचालक कोण आहेत, हे महत्त्वाचे नाही. पण या पदावर जो कोणी असेल, तो विकासविरोधी मानसिकता असलेल्यांच्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणार, असे म्हटले होते. तर मग ईडीचे प्रमुख संजय मिश्रा यांना तिसरी मुदतवाढ का दिली, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.
ईडीप्रमुख संजय मिश्रा यांना नोव्हेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली. (अमित शहा यांना उद्देशून) ईडी ही संस्था कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठी आहे. मग त्यांना तिसरी मुदतवाढ का दिली? काही व्यक्ती सत्ताधारी पक्षाचे राजकीय हित जपतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.