“श्रीगोंदा’ अध्यक्षाच्या मुलावर हल्ला

लोणी काळभोर – हॉर्न वाजविण्याच्या किरकोळ कारणावरून एका कारच्या काचा फोडून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या मुलाला लोखंडी गज व टॉमीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पृथ्वीराज राजेंद्र नागवडे ( 25, रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. निलेश दिवेकर, त्याचे वडील, सागर मुळे, विनोद ढोरे, विराज हरपळे, शुभम हरपळे, महेश डोमाले (दोघेही रा. मांजरी फार्म) व इतर पाच ते सहाजण अशा एकूण तेरा जणांविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी शुभम हरपळे व महेश डोमाले यांना अटक केली आहे.

दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी पृथ्वीराज नागवडे व त्यांचे मित्र योगेश भोईटे व मनीष जाधव (रा. दौंड) हे तिघेजण दोन कारमधून दौंडच्या दिशेने निघाले होते. या दोन गाड्या मांजरी ग्रीन चौकात आल्या. त्यावेळी अचानक एक दुचाकी आडवी आली. त्यावेळी नागवडे यांनी गाडी थांबवली. नागवडे यांनी हॉर्न वाजवला म्हणून दुचाकीवरील दोघांनी त्यांना मारहाण केली. नागवडे यांच्या मित्रांनी मारहाण थांबवली.

मात्र, दुचाकीवरील दोघांनी इतर मित्रांना बोलावून कवडीपाट टोलनाक्‍यावर नागवडे यांची गाडी दुचाकी आडवी मारून थांबवली. नागवडे यांना बेदम मारहाण केली. गाडीच्या काचा फोडून टाकल्या. त्यावेळी त्यातील एकाने जीवे मारण्याची धमकी दिली. नागवडे यांच्या डोक्‍यात दगड मारला. त्यावेळी नागवडे हे शेजारी एका हॉटेलमध्ये लपले. त्यांनतर काही वेळातच लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी ननवरे पोहोचले. त्यांनी शुभम हरपळे व महेश डोमाले यांना ताब्यात घेतले. यात नागवडे यांच्या डोक्‍याला, मानेवर, छाती, पाठीवर दुखापत झाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.