पुणे – युनेस्कोच्या नेतृत्वातील ग्लोबल अलायन्स फॉर पार्टनरशिप ऑन मीडिया अँड इन्फॉरमेशन लिटरसी (गॅपमिल) कडून जगातील विविध भागांत युनेस्कोच्या माध्यम आणि माहिती साक्षरतेसाठीच्या जागतिक कृती आराखड्यावर काम करण्यासाठी जगभरातून 12 युवादूतांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागातील पीएच.डी. संशोधक श्रीराम जावळे यांचा समावेश आहे. त्यांची आशिया-पॅसिफिक प्रदेशासाठी युनेस्कोच्या गॅपमिलचे जागतिक युवादूत म्हणून निवड झाली आहे.
जावळे यांच्यासोबत आफ्रिका, अरब राज्ये, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांतील अन्य युवादूतांचाही समावेश आहे. सर्व युवादूत गॅपलिनच्या जागतिक युवक समितीचे 2019-21 या कालावधीसाठी सदस्य म्हणून आपापल्या विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.