मंचर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने राज्यातील मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी देवस्थाननी लागू केलेल्या वस्त्र संहितेचे पालन करावे, असे आवाहन श्री भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी केले आहे.
हिंदू धर्मात मंदिराचे पावित्र्य जपणे या गोष्टीला महत्व दिले जाते. तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली असून देशभरातील अनेक मंदिर, गुरुद्वारा, चर्चमध्ये, अन्य प्रार्थना स्थळे, खाजगी आस्थापने, शाळा, महाविद्यालय, पोलीस ठाणे आदी ठिकाणी वस्त्रसंहिता पाळली जाते. त्यामुळे राज्यातील हिंदू धर्मातील मंदिरांमध्ये वस्त्रसहिता लागू करावी, असा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिराचे विश्वस्तांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. यामध्ये श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कौदरे यांनाही विचारले असता त्यांनीही होकार दर्शवला .त्यानुसार यापुढील काळात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे वस्र संहितेचे पालन होणार आहे.
मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे वश्रसंहिता लागू करण्यात आली आहे .त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांनी याचे पालन करावे .पुढील काळात या संदर्भात मंदिर परिसरात तोकडी कपडे किवा बरमुडा घालून मंदिरात येऊ नये, मंदिराचे पावित्र्य राखावे, मद्यपान करू नये, या प्रकारचे बोर्ड मंदिर परिसरात लावण्यात येणार आहे. -सुरेश कौदरे, अध्यक्ष, श्री भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट.