वडापुरी, (वार्ताहर) – उन्हाच्या झळा तीव्र होत असताना इंदापूर तालुक्यातील रब्बी हंगामातील गहू पिके काढणीला आली आहेत. तालुक्यातील अनेक भागांत सध्या गहू मळणीला वेग आला आहे. बहुतेक शेतकरी गहू मळणीसाठी हार्वेस्टरला पसंती देत आहेत. मळणीसाठी एकरी 3000 ते 3500 रुपये दर हार्वेस्टरचालक घेत आहेत.
गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पंजाब, हरियाणा भागातून हार्वेस्टरचालक राज्यात दाखल झाले आहेत. मोठ्या हार्वेस्टरमुळे गहू कापणी, गोळा करणी व नंतर लहान हार्वेस्टरने मळणी, असे चित्र आहे. त्यामुळे वेळ व खर्च वाचत आहे. शिवाय पैसेही कमी लागत आहेत.
एका तासात तीन ते चार एकरांतील गव्हाची मळणी व्यवस्थितपणे होत आहे. मजुरांच्या तुलनेत हार्वेस्टर फायदेशीर सध्या मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यात मोठ्या हार्वेस्टरच्या तुलनेत अधिकचा खर्चही येत आहे. एकरी 2500 ते 2800 रुपये खर्च मजुरांकडून गहू कापणी, गोळा करण्यासाठी येतो. ट्रॅक्टरचलित यंत्रणेद्वारे मळणीसाठी प्रतिक्विंटल 300 रुपये खर्च लागत आहे. यामुळे पंजाब, हरियाणातील हार्वेस्टरला गहू मळणीसाठी मागणी आहे. ही मंडळी विविध भागातील पेट्रोल पंप, ढाबे, शेतांमध्ये मुक्कामी राहत आहेत.
अपुर्या मनुष्यबळामुळे हार्वेस्टिंग चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हार्वेस्टिंग मशीन उपलब्ध होत असल्याने शेतकर्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असून कमी वेळेत कमी मनुष्यबळात पीक हाती लागत आहे. हार्वेस्टिंग साठी मोठ्या प्रमाणात मागणी होत असून ते उपलब्ध करण्यासाठी एजंट ची मदत घेतली जात आहे. – भारत यादव, एजंट, हार्वेस्टिंग मशीनपुरवठा