आळंदी – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तसेच मुले व फुले यांची आवड असणारे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच बालगोपालांचे आवडते चाचा नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठया उत्साहात साजरा होणारा बालदिन यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सोमनाथ बेळळे, अरविंद शिंदे, टेकाळे आदी सर्व शिक्षकांच्या शुभहस्ते पंडित जवाहरलाल नेहरू व माऊलींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
प्रशालेच्या उपशिक्षिका भालेराव प्रतिभा यांनी थोर पिढ्यांचे स्मरण व्हावे म्हणून आपण जयंत्या साजऱ्या करतो असे आपल्या प्रास्ताविका मधून सांगितले. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी बालदिनाच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
इयत्ता ४ थी मधील सातपुते आदित्य व आरु प्रणव या मुलांनी ऑनलाईन माध्यमातून चाचा नेहरू यांविषयी माहिती सांगितली. प्रशालेच्या उपशिक्षिका शेळके वैशाली यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत चाचा नेहरूंचा परिचय करून दिला व अपयश तेव्हांच पदरी पडत जेव्हा आपण आपले आदर्श उद्देश आणि सिद्धांत विसरतो ती व्यक्ती यशस्वी होत नाही हा नेहरूंच्या वर्तनातील संदेश या बालदिनाच्या निमित्ताने दिला.
सदर कार्यक्रमास बहुसंख्येने ऑनलाईन उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे आभार प्रशालेच्या उपशिक्षिका कांबळे निशा पंकज यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे तंत्रस्नेही उपशिक्षिक चव्हाण राहुल यांनी केले. तर तांत्रिक बाजू प्रशालेच्या उपशिक्षिका भालेराव प्रतिभा यांनी पार पाडली. बालदिनाचा हा सुंदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका काळे वर्षा यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाची सांगता माऊलींच्या पसायदानाने झाली.