पुणे – हडपसर येथील साडेसातरा नळी येथे 2,500 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या फर्निचरच्या गोदामाला रविवारी पहाटे 3:00च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना सकाळी 7:00 वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले. दुपारी आगीनंतर कुलिंग ऑपरेशन दरम्यान जळालेला मृतदेह सापडला.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले की, राजू भीमसेन काळे (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एका अपघातामुळे काळे यांचे पाय पूर्वी कापण्यात आले होते. ते कृत्रिम पाय वापरत होते. काळे हे कारागीर म्हणून काम करीत होते. काळे हे कधी-कधी गोडाऊनमध्ये रात्री झोपत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घरी जाण्याऐवजी, आग लागली तेव्हा ते गाढ झोपेत असावेत, असा संशय आहे. गोदामात लाकूड व इतर साहित्य असल्याने ते बाहेर पडू शकले नसावेत. याबाबत गोदाम मालकाचे म्हणणे नोंदवायचे आहे.
अग्निशमन केंद्राचे अधिकारी विजय भिलारे आणि सुभाष खाडे यांनी सांगितले की, शहर अग्निशमन दलाला स्थानिक रहिवाशांचे आपत्कालीन कॉल आले. गोदाम गजबजलेल्या वस्तीमध्ये आहे. तेथे भरपूर लाकूड, फ्लेक्स बोर्ड, कापड आणि इतर सामान होते. त्यामुळे भिषण आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि दोन पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झाले. खिडक्या, छत आणि दरवाज्यातून पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली. आग भडकल्याने गोडाऊनमध्ये जाण्याचा मार्गही दिसत नव्हता. अशाही स्थितीत पाण्याचा मारा सुरू ठेवला. सकाळी सातच्या सुमारास गोडाऊनच्या आवारात प्रवेश करता आला. कुलिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आणि दुपारी 1:00च्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या तीन आठवड्यात फर्निचरची गोदामे जळून खाक झाल्याच्या पाच घटना घडल्या आहेत. ही सर्व गोदामे बेकायदेशीर आहेत आणि त्यांच्या आवारात आग नियंत्रणाची कोणतीही सुविधा नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
आठवड्यातील तीन घटना…
दि. 9 नोव्हेंबर : पिसोळी येथे फर्निचरचे दुकान व गोदाम आगीत जळून खाक झाले. कोणीही जखमी झाले नाही.
दि. 25 ऑक्टोबर : बिबवेवाडी येथील फर्निचरचे गोदाम जळून खाक झाले. कोणीही जखमी झाले नाही.
दि. 22 ऑक्टोबर : कोंढवा येथील फर्निचर गोदाम व दुकान जळून खाक झाले. कोणीही जखमी झाले नाही.