खालापूर, (वार्ताहर) – खोपोली येथे माघी गणेश जन्मोत्सव मोठ्या भक्तीमय वातवरणात साजरा झाला. महड येथील श्री क्षेत्र वरदविनायक मंदिरात, सावरोली गणेश मंदिर, खोपोलीत काटरंग येथील श्री सिद्धिविनायक मंदिर, शांतीनगर येथील श्री ओझा गणपती मंदिर व आरडी नगर येथी गणेश मंदिरात गणेश जन्म सोहळा विविध धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांनी जन्मोत्सव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महड अष्टविनायक मंदिरातील आकर्षक रांगोळी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. महड येथील अष्टविनायक क्षेत्र मंदिरात गेल्या तीन दिवसांपासूनच जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते श्रींची महापूजा झाली. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून श्रींचा जन्मउत्सव सोहळा झाला.
या वेळी कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. महड येथील वरद विनायक नवसाला पावतो, अशी ख्याती असल्याने महिलांची मोठी गर्दी होती. परराज्यातील अनेक महिला गणेश जन्मसोहळ्यासाठी उपस्थित होत्या. भाविकांच्या गर्दीमुळे दर्शनरांग दोन किलोमीटरपेक्षा पेक्षा अधिक लांब होती. श्री गणपती संस्थान महडच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य, विश्वस्त, व्यवस्थापक व पोलिसांकडून भाविकांची गैरसोय होवू लक्ष देले जात होते. जन्मोत्सवानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
अष्टविनायक क्षेत्र महडसह तालुक्यातील विविध गणेश मंदिरात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भजन, कीर्तन व गणरायाच्या जयघोषने मंदिर परिसरातील वातावरण भक्तीमय बनले. खोपोलीतील स्वयंभू काटरंग सिद्धीविनायक मंदिर, शांतीनगर येथील श्री ओझा गणेश मंदिर, आरडी नगर गणेश मंदिर येथेही माघी गणेश जन्मोत्सव सोहळा मोठया उत्सहात संपन्न झाला. येथेही सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. कीर्तन, भजन, महाप्रसाद अशा भक्तिमय कार्यक्रमांनी खोपोली व खालापुरात गणेश जन्म उत्सव साजरा झाला.