जिल्हा शल्य चिकित्सकांकडून गंभीर दखल; धर्मशाळा सोडण्याचे आदेश
सातारा – क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या धर्मशाळा विभागात कर्मचाऱ्यांनी मद्यपान केलेल्या प्रकाराची गंभीर दखल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी घेतली असून द्विसदस्यीय समितीकडून या प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आला आहे.
धर्मशाळा विभागात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना तो विभाग सोडण्याचे आदेश बजावण्यात आले असून कारणे दाखवा नोटिसाही देण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्हा रुग्णालयाची खरी लढाई येथील अव्यवस्थांशी आहे. मात्र, हे रग्णालयदेखील आपली जहागिरी असल्याचा काही शुक्राचार्यांचा समज आहे.
अशाच काही महाभागांनी जिल्हा रुग्णालयाच्या धर्मशाळा विभागात एका सामाजिक संघटनेचा पदाधिकारी (मात्र, या पदाधिकाऱ्याने आपणच हे स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा केला), जिल्हा रुग्णालयाचा एक वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक व दंत विभागाचा कर्मचारी, अशा चौघांचे धर्मशाळा विभागातील मद्यपानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर हे गुरुवारी कराड तालुक्यात पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीसमवेत होते. मद्यपान प्रकरणाची तक्रार होताच डॉ. गडीकर यांनी रुग्णालय प्रशासनाला संबंधितांना “कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यास सांगितले. या प्रकरणाचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांना सादर केला जाणार आहे.
दंत विभागाचा कर्मचारी आधीच एका प्रकरणात निलंबित आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी व समुपदेशकांचा या प्रकरणातील सहभाग अतिशय गंभीर आहे. धर्मशाळा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना डॉ. गडीकर यांनी हटवले असून त्यांना तो विभाग सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबधितांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात येणार असल्याचे संकेत असून धर्मशाळा विभागात नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले. धर्मशाळा विभागातील स्वच्छता करण्यात आली आहे.
नुसतेच जिरवाजिरवीचे राजकारण
अमूक एका व्यवस्थेतील उणिवांचे भांडवल करून जिल्हा शल्य चिकित्सक काय करतात, असे गळे काढणाऱ्यांच्या मागे व्यवस्थेतील काही शुक्राचार्य आहेत. जिल्हा रुग्णालय प्रशासन, कर्मचाऱ्यांची ड्युटी, त्यावर देखरेख ही जवाबदारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांकडे देण्यात आली आहे.
धर्मशाळा विभागात यापूर्वीही मद्यपान होत असल्याच्या तक्रारी डॉ. गडीकर यांच्याकडे आल्या होत्या. तेव्हा त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, प्रशासन गाफील राहिल्याने घडलेला हा प्रकार समोर आणून थेट जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बदलीची मागणी करणे योग्य नाही.
“खांदा एकाचा, बंदूक दुसऱ्याची आणि गेम तिसऱ्याचा’ हे राजकारण थांबायला हवे. जिल्हा रुग्णालयातील एका महिलेच्या विनयभंगाचे भांडवल करणाऱ्यांनी नंतर सपशेल माफी मागितल्याची घटना फारशी जुनी नाही. जिल्हा रुग्णालय हे आरोग्य मंदिर असून जबाबदार विश्वस्त म्हणून सर्वांनीच काम करणे आवश्यक आहे.
धर्मशाळा विभागावर प्रत्यक्ष माझेच नियंत्रण राहणार आहे. मद्यपानाच्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याचा अहवाल मागवून योग्य कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.
-डॉ. आमोद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक