राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून टोळीचा पर्दाफाश
मुंबईत 10 लाखांचा विदेशी दारूचा साठा पकडला
मुंबई (प्रतिनिधी) – “ड्युटी फ्री’च्या नावाखाली उच्चभ्रु वस्तीमध्ये बनावट विदेशी मद्य (स्कॉच) विकणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. जोगेश्वरी येथे केलेल्या कारवाईत 10 लाखांचा बनावट विदेशी दारूचा मोठा साठा पकडला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.
उत्पादन शुल्क विभागाने सातांक्रुझ येथे जेठालाल नामक व्यक्तिला बनावट विदेशी मद्याच्या बाटल्यांची वाहतू करताना अटक केली. या व्यक्तीकडे एक लिटरच्या 6 ब्लॅक लेबल बनावट व्हीस्कीच्या बाटल्या आढळल्या. त्याने तपासात दिलेल्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्यास जोगेश्वरी येथे मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मद्याची निर्मिती करण्यात येत असल्याची माहीती मिळाली.
ही टोळी जोगेश्वरी येथिल मजासगाव टेकडीमध्ये कैलासपती चाळीत सक्रीय होती. या कारवाईत 1 हजार मि.ली.च्या 77 बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार बाटल्या, 750 मि.ली.च्या 37 भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रॅंडच्या सीलबंद बाटल्या, 2 हजार मि.ली.च्या भारतीय बनावटीच्या 10 विदेशी मद्याच्या विविध ब्रॅंडच्या सीलबंद बाटल्या, देशी दारू, तसेच 1 हजार मि.ली.च्या 336 विदेशी मद्य विविध ब्रॅंडच्या रिकाम्या बाटल्या, त्याचबरोबर विविध विदेशी मद्य बाटल्यांचे बनावट बुचे इतर साहित्यासह एकूण 10 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भेसळयुक्त दारु crime