नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाची पूर्वपरवानगी न घेता राष्ट्रीय शिबिर सोडून जाणाऱ्या 25 महिला खेळाडूंना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साक्षी मलिकचाही समावेश आहे.
लखनौ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात हे शिबिर सुरू आहे. या शिबिरात अनुपस्थिती राहण्यापूर्वी महासंघाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र सहभागी झालेल्या 45 खेळाडूंपैकी 25 खेळाडू अनुपस्थित राहिल्या आहेत. त्यामध्ये जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या साक्षी (62 किलो), सीमा बिस्ला (50 किलो) व किरण (76 किलो) यांचा समावेश आहे.
दरम्यान महासंघाने जागतिक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची निवड केली आहे. त्यामध्ये या तीन खेळाडूंबरोबरच विनेश फोगट (53 किलो), ललिता (55 किलो), सरिता मोर (57 किलो), पूजा धांडा (59 किलो), दिव्या काक्रन (68 किलो), कोमल (72 किलो) यांनाही स्थान मिळाले आहे.