महापौरांना अभय उपमहापौरही बदलणार?
पुणे – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून महत्त्वाचे खांदेपालट करण्यात येणार आहेत. याची सुरुवात सभागृहनेते बदलापासून करण्यात येणार असून नगरसेवक गणेश बीडकर हे नवे सभागृह नेते असणार आहेत. भाजपकडून त्याबाबतचे पत्र गुरूवारी बीडकर यांना देण्यात आले.
तर, आज (शुक्रवारी) महापालिकेत पक्षाच्या नगरसेवकांची बैठक होणार असून त्यानंतर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाकडून केली जाणार आहे. दरम्यान, सभागृह नेते पदासोबतच पुढील काही दिवसांत उपमहापौरही बदलले जाणार असून त्यानंतर पक्षाकडून महापौर तसेच स्थायी समिती अध्यक्षांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही पदांबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्विकृत नगरसेवक सभागृह नेते होणार आहेत.
मागील वर्षी या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना, सभागृह नेतेपद तसेच उपमहापौरपद एका वर्षासाठीच असणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होताना तसेच अगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपने महापालिकेत खांदेपालट करण्यास सुरूवात केली आहे.
वर्षभरापूर्वी महापौरपद मुरलीधर मोहोळ, उपमहापौर म्हणून सरस्वती शेंडगे आणि सभागृहनेतेपद घाटे यांच्याकडे आले. तर, माजी स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे आमदार झाल्याने, त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर समिती अध्यक्षपद हेमंत रासने यांच्याकडे देण्यात आले. मात्र, या पदाधिकाऱ्यांना वर्षभरासाठीच संधी असल्याचे सांगत, भाजपमधील इच्छुकांनी पदाधिकारी बदलण्याचा आग्रह नेतृत्वाकडे धरला होता. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत उत्सुकता होती. शेवटी सभागृहनेते म्हणून बीडकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.